सोसायटी समिती ही दर पाच वर्षांनी बदलणे आवश्यक आहे आणि तसा कायदाच आहे.
सहकारी
गृहनिर्माण संस्थांची उभारणीच मुळी ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उद्देशानेच झालेली आहे. परंतु दु:खद
बाब अशी की, आज या
उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
सोसायटीमधील
सदस्य व निवडून दिलेली समिती या दोघांचीही सारखीच जबाबदारी आहे, याचा विसर पडतो. प्रथमत: निवडून
आलेल्या समितीने बायलॉजमध्ये उल्लेख असलेल्या सोसायटीचे सभासद आणि त्यांची
जबाबदारी याची फोटोप्रत प्रत्येक सभासदास दिल्यास बहुतेक समस्यांचं निवारण होण्यास
मदत होईल. परंतु कोणत्या सोसायटीत याचं पालन होतं? परिणामी समस्या व मतभेद निर्माण
होण्याची शक्यता अधिक. सहकारी तत्त्वांचा उद्देश विफल होतो तो यामुळेच.
सोसायटी
समिती ही दर पाच वर्षांनी बदलणे आवश्यक आहे आणि तसा कायदाच आहे. गृहनिर्माण
संस्थांमध्ये सचिव म्हणून काम करण्यास सहसा कोणी तयार होत नाही, परत्वे त्याच व्यक्तीस सचिव म्हणून काम
करावे लागते. आणि यातूनच अरेरावी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याकरिता प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी पार पाडावी.
सोसायटीचं
कामकाज पाहताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते व त्यातील या काही प्रमुख
गोष्टी.
* मासिक
शुल्क थकबाकी-
काही सभासद परिस्थिती असूनही मासिक शुल्क वेळेवर भरत नाहीत. परिणामी
सचिवास कामकाज चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कामकाजासाठी आपला अमूल्य
वेळ देणाऱ्या आपल्या सचिवास काम करणं सुलभ व्हावं म्हणून प्रत्येक सभासदाने आपलं
कर्तव्य पार पाडावं.
* सोसायटीच्या
दप्तरी नोंदी अद्ययावत न होणे किंवा दुर्लक्ष होणे-
सोसायटीची सर्व रजिस्टर्स
अद्ययावत करण्यावर भर देण्यात यावा.
* कोणतीही
समस्या लेखी स्वरूपात देणे-
एखाद्या सभासदाने लेखी स्वरूपात समस्या दिल्यास तो
आपला अपमान आहे, असा समज
करून घेऊ नये. कारण अशा समस्यांची दप्तरी नोंद आवश्यक असल्यामुळे मासिक सभेत चर्चा
विचार-विनिमय होऊन तिचं निराकरण करणे सुलभ होते.
* नियमांचं
उल्लंघन-
एखाद्या सभासदास आपल्या घरात मोठं काम करावयाचं असल्यास त्याबाबत सविस्तर
माहिती समितीकडे देणे बंधनकारक आहे. पण असं क्वचितच होत असावं. याबाबतीत योग्य ती
दक्षता घेण्यात यावी.
* सोसायटीच्या
स्वच्छतेविषयीची अनास्था- आपण ज्या
इमारतीत राहतो त्या इमारतीची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व उच्चाटन आणि
इमारतीची देखभाल यांकडे लक्ष देणे ही आपली सर्वाचीच जबाबदारी आहे. आणि याची जाणीव
सर्व सभासदांना असावी. यामुळे इमारतीचं व आपलंही आयुष्यमान वाढण्यास मदत होते.
* मासिक सभा
व सर्वसाधारण वार्षिक सभांबाबत अनास्था- मासिक सभेस समितीमधील सर्वानीच उपस्थित
राहणं अनिवार्य आहे. बहुसंख्येने उपस्थित राहिल्यास पुढील कामकाज व समस्या यांबाबत
सर्वानुमते निर्णय घेऊन शिक्कामोर्तब करणं केव्हाही हिताचंच. वार्षिक सर्वसाधारण
सभेत मात्र अनेकांची अनुपस्थिती जाणवते. परंतु सभेत बहुमताने जो निर्णय होईल तो
सर्वानाच बंधनकारक असतो. सभेला अनुपस्थित राहून सभेत संमत झालेल्या निर्णयांवर
काथ्याकूट करणे योग्य नाही.
आपल्या
कुटुंबाचं स्वास्थ्य जपण्यासाठी आपण जशी दक्षता घेतो, त्याप्रमाणे आपल्या इमारतीच्या
स्वास्थ्यासाठी प्राधान्यानं दक्षता घेणं आवश्यक. कारण आपली इमारत व सर्व सभासद
हेसुद्धा एक कुटुंबच आहे, याचंही
भान ठेवावे.
लोकसत्ता टीम | February 15, 2020 12:50 am
राजन बुटाला
butala21@gmail.com