गोंधळी वृत्तीच्या सभासदांना प्रत्येक गोष्टीत नकारात्मक भाव अधिक प्रमाणात
दिसून येत असतात.
गृहनिर्माण
संस्थांमध्ये असणाऱ्या गोंधळी सभासदांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणे हा असून
त्याला अटकाव किंवा प्रतिबंध कसा करता येईल यावर विचारमंथन व्हावे हा आहे. तो झाला
तर गृहनिर्माण संस्थांचे ‘आरोग्य’ निरोगी राखण्यास
सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना हुरूप येईल, शिवाय नकारात्मकते ऐवजी सकारात्मकतेकडे गृहनिर्माण
संस्थांची वाटचाल जोमाने सुरू होईल.
गृहनिर्माण संस्थेतील कार्यकारिणीला आणि पदाधिकाऱ्यांना
सोसायटीचे दैनंदिन व्यवस्थापन करताना येणाऱ्या अडचणींचा सामना करणं ही ‘अटळ’ बाब असून ती गृहीतच धरावी लागते. पण त्याचबरोबर
सोसायटीमधील ‘गोंधळी’ सभासदांचा नाहक
मुकाबला करावा लागणं ही ‘पारदर्शी’ कारभार करू
इच्छिणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या दृष्टीने त्रासदायक आणि चीड आणणारी बाब ठरते.
‘गोंधळी’ वृत्तीची जोपासना
करणारे जे सभासद असतात त्यांचा एकमेव आणि एककलमी कार्यक्रम म्हणजे कार्यकारिणीच्या
प्रत्येक कामात ‘खो’ घालत राहणे, वादविवाद करणे, अन्य सभासदांचा
बुद्धिभेद करणे आणि अधिमंडळाच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ‘आरडाओरडा’ करून गोंधळ घालणे
हाच असतो.
अशा वृत्तीच्या सभासदांमुळे सोसायटीचे दैनंदिन आणि वार्षिक
सभेतील वातावरण काही अंशी गढूळ बनते आणि कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांचे मन
तात्पुरत्या काळासाठी विचलितही होते. अर्थात या गोंधळी सभासदांना त्यांचा हेतू
यशस्वी करण्याची संधी देणं किंवा न देणं हे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या
गुणवत्तेवर आणि सभा संचालन करण्याच्या कौशल्यावरही बऱ्याच अंशी अवलंबून असते.
गोंधळी वृत्तीच्या सभासदांना प्रत्येक गोष्टीत नकारात्मक
भाव अधिक प्रमाणात दिसून येत असतात. प्रत्येक कृतीमागील ‘लंगडय़ा’ बाबींवर बोट
ठेवून उणी-दुणी काढण्यातच हे सभासद धन्यता मानतात. नकारात्मक वृत्ती बाळगून
वावरणारे असे सभासद आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो. त्या स्वत:च्याच सोसायटीच्या
कल्याणकारी उपक्रमांमध्ये ‘खो’ घालत आहोत.
याचंही भान त्यांना नसतं. कारण वैयक्तिक ‘अहं’ भावापुढे त्यांना अन्य गोष्टी दुय्यम वाटत असतात. अशा
कुरापती काढण्यामागे त्यांचं एखाद्या विषयातलं वैयक्तिक अपयशही कारणीभूत असतं.
प्रामाणिक आणि स्वयंप्रेरणेने काम करण्याची इच्छा असणाऱ्या
कार्यकारी मंडळास अशा विघ्नसंतोषी आणि विकृत मनोवृत्तीच्या सभासदांमुळे नाहक त्रास
होत असतो. तथापि प्रचलित सहकार कायद्यातील उपविधीमध्ये अशा गोंधळी आणि विघ्नसंतोषी
सभासदांना पायबंद घालण्याची कोणतीही तरतूद दिसून येत नाही. त्यामुळे अशा सभासदांना
त्यांचे सभासदत्वाचे ‘हक्क’ बहाल करण्यापासून
कसे वंचित ठेवता येईल याची पुरेशी स्पष्टता विद्यमान उपविधीमध्ये दिसून येत नाही.
गृहनिर्माण संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमधून होणारा
गोंधळ, आरडाओरड, वैयक्तिक दोषारोप
पाहता किमान अशा सभासदांना वार्षिक सभेमध्ये भाग घेण्यास मनाई करता येईल का? याचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
सभेमध्ये केवळ हरकतीच उपस्थित करावयाच्या, प्रत्येक विषयावर वादावादीच करायची याच हेतूने प्रेरित होऊन
आलेले सभासद सभेचे वातावरण बिघडवून टाकतात. सभाशास्त्राचे किमान नियमही पाळत
नाहीत.. अशा वेळी सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आलेले
सभासद विचलित होतात.. आणि ‘सभेला यायचे कशाला?’ असा प्रश्न त्यांच्या
मनात तयार होतो. अनेक गृहनिर्माण संस्थांच्या वार्षिक सभांना सभासदांची असणारी
अल्प उपस्थिती याचं हे एक प्रमुख कारण आहे.
विषय पत्रिकेवरील कुठल्याही मुद्दय़ाबाबत विरोध दर्शविणे, असहमती व्यक्त करणे किंवा निषेध व्यक्त करणे यासाठी
सभाशास्त्राचे काही नियम आहेत.. टप्पे आहेत. त्याद्वारे सभासद आपली नापसंती व्यक्त
करू शकतात. पण हे सर्व नियम पायदळी तुडवून स्वत:ची अरेरावी प्रस्थापित करण्यासाठी
केविलवाणी धडपड करणारे सभासद पाहिले म्हणजे त्यांच्या बौद्धिक अशिक्षितपणाची कीव
येते.
वस्तुत: सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यकारिणीच्या
वर्षभराच्या कामकाजाचं मूल्यमापन करण्यासाठी आयोजण्यात येत असते. वर्षभरात
केलेल्या आणि भविष्यात केल्या जाणाऱ्या कामांबाबत विस्तृत चर्चा करण्याचं ते एक
व्यासपीठ आहे. एका अर्थाने सोसायटीच्या प्रकृतीचा ‘आरसा’ म्हणून या सभेकडे गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे.
विषयानुरूप मुद्देसूद चर्चा करणे, विषयाची दुसरी
बाजू मांडणे, सोसायटीला पोषक आणि मारक बाबींची चर्चा करणे आणि
नियमानुसार कार्यकारिणीचे दैनंदिन कामकाज होत आहे की नाही यासाठी ‘पहारेकऱ्या’ची भूमिका बजावणे
हे काम सभासदांकडून अपेक्षित आहे. पण अनेक ठिकाणी ‘स्पीड ब्रेकर’ची भूमिकाच वठविण्यात पूर्वग्रहदूषित मनोवृत्तीचे सभासद
धन्यता मानतात. परिणामी ‘मुख्य प्रश्न’ बाजूला पडून सभा
भरकटते.
विशेषत: ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर बदललेले कायदे, कार्यपद्धती, प्रसंगानुरूप
त्यात वेळोवेळी होणारे बदल याचं वाचन आणि अभ्यास प्रत्येक सभासदानं करणं आवश्यक
आहे. जेणेकरून विद्यमान सहकारी कायद्यानुसार सोसायटीचे काम सुसंगत पद्धतीने सुरू
आहे की विसंगत पद्धतीने? याची जाण सभासदांना येऊ शकेल. पण तो अभ्यास न करता, ते ज्ञान न मिळवता स्वत:जवळ असलेल्या अर्धवट माहितीचा आधार
घेऊन विसंगत व्यवहार करीत राहणं केव्हाही समर्थनीय ठरू शकत नाही. गमतीचा भाग
म्हणजे अशा गोंधळी सभासदांचं नेतृत्व करणारा स्वयंभू नेता अनेकदा स्वत: सभेला
उपस्थित न राहता मोबाईलवर फोन करून स्वत:च्या पाठीराख्यांना सभा सुरू असताना
वेळोवेळी सूचना देत असतो. आणि त्याचे पाठीराखे असंमजसपणे त्यांना मिळणाऱ्या
सूचनांचा आदर करीत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उलटसुलट कोलांटय़ा मारीत असतात.
मात्र असं करीत असताना स्वत:च्या कृतीमुळे आपण ज्या सोसायटीत राहतो त्या आपल्याच
सोसायटीचं आपण आपल्याच हातांनी नुकसान करीत आहोत याचं भान त्यांना येत नाही आणि जर
ते येत असेल तर त्याकडे ते सोयीस्करपणे दुर्लक्ष तरी करतात.
या लेखाचा उद्देश हा गृहनिर्माण संस्थांमध्ये असणाऱ्या
गोंधळी सभासदांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणे हा असून त्याला अटकाव किंवा प्रतिबंध
कसा करता येईल यावर विचारमंथन व्हावे हा आहे. तो झाला तर गृहनिर्माण संस्थांचे ‘आरोग्य’ निरोगी राखण्यास
सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्यांना व पदाधिकाऱ्यांना हुरूप येईल, शिवाय नकारात्मकते ऐवजी सकारात्मकतेकडे गृहनिर्माण
संस्थांची वाटचाल जोमाने सुरू होईल.
अरविंद चव्हाण | Updated: June 10, 2017 5:13 AM