या लेखात उल्लेख केलेल्या गृहनिर्माण संस्थेने हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा केला आहे, असे
, ‘वास्तुरंग’ मधील ‘गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची खडतर वाटचाल.. एक अनुभव’ हा मंजिरी घैसास यांचा लेख वाचला. या लेखाद्वारे लेखिकेने एका महत्त्वपूर्ण विषयाचा सविस्तर उहापोह केला आहे. या लेखात उल्लेख केलेल्या गृहनिर्माण संस्थेने हा प्रश्न विनाकारण प्रतिष्ठेचा केला आहे, असे म्हणावेसे वाटते. गृहनिर्माण संस्थेच्या सभासदाने नॉमिनेशन केले असल्यास नॉमिनीच्या नावे मूळ सभासदाच्या निधनानंतर सभासदत्व देण्यास काहीच हरकत नाही. उच्च न्यायालयाच्या विविध निकालांनुसार
नॉमिनी म्हणून नेमलेली व्यक्ती विश्वस्ताच्या भूमिकेत असते. नॉमिनेशनच्या आधारावर अशी व्यक्ती संपूर्ण हक्क सांगू शकत नाही. एखाद्या सोसायटीने सर्व बाबींची पूर्तता करून घेऊन नॉमिनीच्या नावे सभासदत्व दिले असल्यास पुढे सोसायटीची जबाबदारी राहणार नाही. दिवंगत सभासदाच्या वारसांनी त्याबाबत काही हरकत निर्माण केल्यास तो वाद वारस आणि नॉमिनी यांच्या मधील राहील. अशा वादामध्ये सोसायटी कुठल्याही प्रकारे जबाबदार राहू शकणार नाही. लेखात उल्लेख केलेल्या गृहनिर्माण संस्थेने नॉमिनीला सभासदत्व देताना नॉमिनीने या जागेची विक्री करण्याचे ठरविल्यास त्याने वारस प्रमाणपत्र आणावे. या टाकलेल्या अटीचा फेरविचार करून ही अट शिथिल करता येऊ शकेल. कारण नॉमिनीने विक्री केल्यास ती त्याच्या जबाबदारीवर असेल. भविष्यात एखाद्याकडून सदर सदस्याच्या मालकीला आव्हान दिले गेल्यास याआधी उल्लेख केल्यानुसार ती जबाबदारी सोसायटीवर न राहता त्या सभासदावर राहील. आवश्यक नसेल त्या वेळी सोसायटीने वारस दाखला न्यायालयाकडून मागण्याचा आग्रह धरू नये, असे सुचवावेसे वाटते. कारण वारस दाखला प्राप्त होण्यासाठी त्या मिळकतीच्या बाजार मूल्यानुसार
मोठय़ा रकमेचा कोर्ट फी स्टॅम्प द्यावा लागतो. शिवाय केवळ वारस दाखल्याच्या आधारेदेखील वारस दाखला प्राप्त केलेली व्यक्ती संपूर्ण मालकी हक्क सांगू शकत नाही.
अॅड. सुरेश पटवर्धन,कल्याण.