Showing posts with label lekh. Show all posts
Showing posts with label lekh. Show all posts

गृहनिर्माण संस्थेच्या थकबाकीची वसुली व सुधारित सहकार कायदा

Posted by DK on April 19, 2022

 गृहनिर्माण संस्थांना सदस्यांकडून येणे असलेल्या रकमांची वसुली करण्याबाबत सुधारित सहकार कायद्याच्या अनुषंगाने कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत त्याविषयी..

 

गृहनिर्माण संस्थांना सदस्यांकडून येणे असलेल्या रकमांची वसुली करण्याबाबत सुधारित सहकार कायद्याच्या अनुषंगाने कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत त्याविषयी..

सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यामागचे उद्देश प्रामुख्याने, तिचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय यांना निवारा उपलब्ध करून देणे व अशा निवाऱ्याची योग्य प्रकारे देखभाल व व्यवस्थापन करणे हेच असतात. त्यामागे कोणताही व्यावसायिक उद्देश नसतो. संस्थेच्या उपविधीप्रमाणे संस्थेच्या मालमत्तेचे व्यवस्थापन, देखभाल व प्रशासन करणे ही सर्व सदस्यांची सांघिक आणि वैयक्तिक जबाबदारी व कर्तव्यही असते. त्यामुळे या उद्दिष्टपूर्तीसाठी लागणारा खर्च संस्थेने वाटून दिल्याप्रमाणे उचलणे हीसुद्धा प्रत्येक सदस्याची कायदेशीर आणि नैतिक जबाबदारी व कर्तव्य असते. आपल्या गृहनिर्माण संस्थेचा कारभार केवळ आपण दिलेल्या आर्थिक योगदानावरच अवलंबून आहे याची जाणीव प्रत्येक सदस्याने ठेवणे आवश्यक आहे.  गृहनिर्माण संस्थेचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय सतत एकमेकांच्या निकट वा संपर्कात असतात.  त्यामुळेच गृहनिर्माण संस्थेचा कारभार अधिकाधिक कार्यक्षम व सुलभतेने चालवण्यासाठी संस्थेचे सदस्य सांघिक भावनेने व सामंजस्याने सर्व प्रकारचे योगदान देतील असे अपेक्षित असते. तरीही बहुतांश गृहनिर्माण संस्थांमध्ये बरेच सदस्य याबाबतीत बेपर्वा असतात. काही सदस्य वैयक्तिक अडचणींमुळे, उदासीनतेने वा अनवधानाने, तर काही सदस्य जाणूनबुजून आपले आर्थिक योगदान वेळेवर संस्थेकडे जमा करीत नाहीत व त्यामुळे अशा संस्था सतत आर्थिक चणचण अनुभवतात. मुंबईसारख्या महानगरात जिथे महापालिकेचा मालमत्ता कर व पाणीपट्टी भरण्याची जबाबदारी संस्थेवरच असते तिथे ही परिस्थिती अधिकच गंभीर असते. गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून उरलेल्या वेळात संस्थेचा कारभार स्वयंसेवी वृत्तीने सांभाळण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे वसुलीसाठीच्या कारवाईला आवश्यक तेवढा वेळ त्यांना देता येत नाही व त्याचाच गैरफायदा काही बेपर्वा सदस्य घेत असतात. या संदर्भाने गृहनिर्माण संस्थांना सदस्यांकडून येणे असलेल्या रकमांची वसुली करण्याबाबत सुधारित सहकार कायद्याच्या अनुषंगाने कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत याचा विचार करू या.

 

सुधारित अधिनियमातील कलम १५४ब१(११)मध्ये ‘कसुरदार’ म्हणजे देयक वा नोटीस बजावल्यापासून तीन महिन्यांत संस्थेची देणी देण्यास कसूर करणारा सदस्य/ सदनिकाधारक/ भोगवटादार, तसेच कलम १५४ब-१(१२) मध्ये ‘देणी’ म्हणजे लागू असलेल्या तरतुदींनुसार देयकाद्वारे वा लेखी नोटिसीद्वारे संस्थेने मागणी केलेली व सदस्याकडून येणे असलेली रक्कम, असे स्पष्ट करण्यात आले आहे.  उपविधी ७०(ब) मध्ये सदस्याने देखभाल व सेवाशुल्क भरण्यास कसूर केल्यास, समिती अशा सदस्याविरुद्ध अधिनियमातील कलम ९१ किंवा १०१ खाली वसुलीची कार्यवाही करेल अशी तरतूद आहे. परंतु मूळ अधिनियमातील कलम १०१ आता गृहनिर्माण संस्थांसाठी गैरलागू करण्यात आले आहे व त्याऐवजी सुधारित अधिनियमातील कलम १५४ब-२९मध्ये गृहनिर्माण संस्थांना येणे असलेल्या सर्व रकमांची वसुली जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे करण्यासाठीच्या तरतुदी अंतर्भूत केल्या आहेत.  त्यामुळे उपविधी ७०(ब) मधील कलम १०१ चा संदर्भ आता ‘कलम १५४ब-२९’ असा वाचवा. कलम ९१ मधील वाद-निवारणाबाबतच्या तरतुदी संस्थेची देणी वसूल करण्यासंदर्भात लागू होत नाहीत, कारण आता या वसुलीसाठी कलम १५४ब-२९खाली निबंधकाने दिलेले वसुलीचे प्रमाणपत्र अंतिम असून कोणत्याही न्यायालयात त्यावर विवाद करता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद आहे. त्यामुळे उपविधी ७०(ब)मधील कलम ९१चा संदर्भ निर्थक आहे. उपविधी ७१मध्ये सदस्याने थकविलेल्या आकारणीवर दरसाल २१ टक्क्यांपर्यंत सदस्य-मंडळ ठरवेल त्या दराने व्याज आकारणी आवश्यक असेल अशी तरतूद आहे.

आता अधिनियमाच्या कलम १५४ब-२९प्रमाणे गृहनिर्माण संस्थेने, तिची देणी वसूल करण्यासाठी किंवा तिच्या दुरुस्ती व देखभाल खर्चाच्या, बांधकाम खर्चाच्या आणि सेवा-आकाराच्या वसुलीसाठी केलेल्या अर्जावरून, निबंधकास त्याला योग्य वाटेल अशी चौकशी केल्यावर, थकबाकी म्हणून येणे असलेल्या रकमेचे वसुलीचे प्रमाणपत्र देता येईल. संबंधित संस्थेने मात्र थकबाकीच्या संबंधांतील लेख्यांचे विवरणपत्र आणि विहित करण्यात येईल त्याप्रमाणे कोणतेही इतर दस्तऐवज निबंधकास सादर करणे आवश्यक आहे. पुढे अशीही तरतूद आहे की, जर निबंधकाची खात्री झाली की संबंधित संस्थेने वसुलीची कारवाई करण्यात कसूर केली आहे, तर निबंधकास स्वत: होऊन वसुलीचे प्रमाणपत्र देता येईल व असे प्रमाणपत्र संबंधित संस्थेने केलेल्या अर्जावरून देण्यात आले असल्याचे मानण्यात येईल. निबंधकाने दिलेले वसुलीचे प्रमाणपत्र त्यात नमूद थकबाकीच्या रकमेचा निर्णायक पुरावा असेल व ही रक्कम अमलात असलेल्या कायद्यानुसार जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्यायोग्य असेल. या प्रमाणपत्राबाबत कलम १५४ अन्वये निबंधकाकडे वा राज्य सरकारकडे  पुनरीक्षण ( १ी५्र२्रल्ल) अर्ज करता येईल, परंतु ते कोणत्याही न्यायालयात विवाद करण्यास पात्र असणार नाही. कसूरदार व्यक्तीस जर कलम १५४ अन्वये पुनरीक्षण अर्ज करावयाचा असेल, तर प्रमाणपत्रान्वये देय असलेल्या रकमेच्या किमान ५०% रक्कम संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे.  संस्थेस देय असलेली थकबाकी व व्याजाची रक्कम आणि वसुलीसाठी आलेला खर्च यांची फेड होईपर्यंत किंवा निबंधकाचे समाधान होईल अशा रीतीने अशा रकमेच्या फेडीबाबत तारण देण्यात येईपर्यंत, जिल्हाधिकारी वा निबंधक कायदेशीर तरतुदीनुसार खबरदारीच्या उपाययोजना करू शकतात- अशा उपाययोजनांमध्ये संबंधित कसूरदार व्यक्तीची स्थावर वा जंगम मालमत्ता जप्त करणे, अशा जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावातून जमा झालेल्या रकमेमधून संस्थेला देय असलेल्या सर्व रकमा संस्थेकडे जमा करणे या बाबी समाविष्ट असू शकतात.  

 

नवीन कलम १५४ब-७मध्ये गृहनिर्माण संस्थेची देणी चुकती केल्याखेरीज सदस्याने केलेले सदनिका व शेअरचे विक्री हस्तांतरण परिणामकारक असणार नाही अशी स्पष्ट तरतूद आहे. कलम १५४-१०मध्ये, संस्थेने निश्चित केलेल्या मुदतीत संस्थेची देणी चुकती करणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे; तसेच कसूरदार सदस्य समितीचा सदस्य म्हणून नियुक्त वा स्वीकृत केला जाण्यास, निवडून दिला जाण्यास किंवा तिचा सदस्य म्हणून राहण्यास पात्र असणार नाही, अशा स्पष्ट तरतुदी आहेत.  

वरील कायदेशीर तरतुदींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गृहनिर्माण संस्थेने व समितीने थकबाकीच्या वसुलीसंदर्भाने कशी कार्यवाही करणे आवश्यक आहे, याचा विचार करू.

  • सर्वप्रथम प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या समितीने उपविधी ६७(अ)मधील तरतुदींनुसार प्रत्येक सदनिकेसाठी संस्थेच्या खर्चाच्या हिश्श्यापोटी सदस्याचा वाटा निश्चित करणे आणि त्यासाठीच्या देयकाचा नियत-काळ व देय दिनांक ठरवणे आवश्यक आहे व त्यानुसार समितीने ठरविलेल्या दिनांकापूर्वी देयके बनवून ती प्रत्येक सदस्यापर्यंत नियमित पोचवणे ही सचिवाची जबाबदारी आहे.    
  • देयकातील देणी जर सदस्याने देय-दिनांकापर्यंत दिली नाहीत तर पुढील देयकामध्ये थकबाकीवर सदस्य-मंडळाने ठरवलेल्या दराने व्याज आकारणी करणे आवश्यक आहे. 
  • देयक वा मागणी नोटिस दिल्यापासून तीन महिन्यांच्या आत संस्थेकडे देणी जमा न करणाऱ्या सदस्यास ‘कसूरदार’ धरून त्याचा मालमत्ता विक्रीचा अधिकार गोठवण्याची व समितीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार रहित ठेवण्याची जबाबदारी समितीची आहे.
  • थकबाकीच्या वसुलीसाठी समितीने खालील कार्यवाही करावी :

(१) दर महिन्याला कसूरदार सदस्यांची यादी, त्या प्रत्येकाकडून देय असणाऱ्या रकमासहित संस्थेच्या नोटीस बोर्डावर लावावी.

(२) सर्व थकबाकीवर सदस्य-मंडळाने ठरवलेल्या दराने नियमित व्याज-आकारणी करावी व ती पुढच्या देयकामध्ये देणी म्हणून दाखवावी.

(३) दर तीन महिन्यांनी सर्व कसूरदार सदस्यांना लेखी मागणी-नोटिस पाठवून थकबाकी, व्याज व त्या महिन्याच्या देयकातील देणी त्वरित देण्याविषयी मागणी करावी.

(४) मधल्या काळात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कसूरदार सदस्यांना वैयक्तिक संपर्क साधून व गरज पडली तर समितीसमोर आणून थकबाकी त्वरित जमा करण्याविषयी आणि तसे न केल्यास होणाऱ्या परिणामांची सूचना देण्याचा प्रयत्न करावा.

(५) समितीने एक सीमा ठरवून, थकबाकी जर त्या सीमेबाहेर गेली तर अशा सदस्याला वकिलामार्फत मागणी नोटीस पाठवून थकबाकी व्याजासहित त्वरित देण्याची मागणी करावी.

(६) तरीही जर सदस्याने देणी संस्थेकडे जमा करण्यास दिरंगाई केली, तर संस्थेने वकिलामार्फत कलम १५४ब-२९अनुसार कारवाई करावी; थकबाकी व व्याजाची रक्कम आणि वसुलीसाठी आलेला खर्च अशा सर्व रकमांची वसुली या कलमांतर्गत होऊ शकते.  

 

Written by लोकसत्ता टीम / श्रीश कामत

December 11, 2021 1:45:50 am

kamat.shrish@gmail.com

 

आम्हीच ज्ञानी-अगाध ज्ञान आमुचे!

Posted by DK on April 19, 2022
सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच सहकार. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असेच उद्दिष्ट असायला हवे, पण प्रत्यक्षात चित्र दिसते मात्र वेगळे! 

सहकारी गृहनिर्माण संस्था म्हणजेच सहकार. ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असेच उद्दिष्ट असायला हवे, पण प्रत्यक्षात चित्र दिसते मात्र वेगळे! सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वेगवेगळे, काही वेळा विक्षिप्त, विचित्र असे अनुभव पहायला, ऐकायला मिळतात. त्यातील एक : ठाण्यातील एका गृहनिर्माण संस्थेमधील ही खरी घटना आहे. फ्लॅटमध्ये सुरू झालेली गळती वरच्या मजल्यावरील फ्लॅटधारकाच्या निदर्शनास आणून दिली असता प्रथमत: ती मान्यच करण्यात आली नाही, होत असलेली गळती आमच्याकडून नाहीच असा ठाम पवित्रा घेतला गेला. गळतीचं गंभीर स्वरूप दुसऱ्यांदा निदर्शनास आणून दिले असता मी सिव्हिल इंजिनीअर आहे, कुठून गळती होत आहे हे मला चांगलं माहीत आहे, तुम्ही खाली सिमेंट लावून घ्या अशी मुक्ताफळे उधळण्यात या आडमुठय़ा सदस्याचा हात! आपल्याकडून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी आपणच घ्यायला हवी याची जाणीव अशा आडमुठय़ा सदस्यांना नसावी याचंच वैषम्य वाटतं. सरतेशेवटी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचं सूतोवाच करण्यात येताच अशा आडमुठय़ा व उर्मट सदस्याचं डोकं ठिकाणावर येतं, मुळात अशी पाळी आपल्यावर येणार नाही याची दक्षता आधी घेतली असती तर ही वेळच आली नसती. असो, वेळेवर जाग आली हेही नसे थोडके! 

 अनेक गृहनिर्माण संस्थांमधल्या अशा आडमुठय़ा सदस्यांकडून समस्या जाणीवपूर्वक निर्माण होत असल्याची असंख्य उदाहरणे सापडतील. यापूर्वी कन्सिल्ड पाइिपग करताना जीआय पाईपचा वापर होत असे, कालांतराने पाइपचे थ्रेड गंजल्याने त्यातून गळती होत असे, पण आता चांगल्या दर्जाचे प्लास्टिक पाइप उपलब्ध असल्याने उत्तम प्रकारे काम करता येते. पाइप कोणताही असो, कायद्यानुसार ज्याच्या घरातून गळती होत आहे त्यानेच ती गळती कायमस्वरूपी थांबवायची आहे. ज्याच्या घरात गळती होत आहे त्याच्याकडून खर्चाची कोणतीही मागणी करता येत नाही. ज्या सभासदाच्या घरातून गळती होते त्या सभासदाला त्रास होत नसला तरी ती गळती कोणताही आडपडदा न ठेवता त्वरित थांबवावी. कारण खाली राहणाऱ्या व्यक्तीला त्रास होतोच, शिवाय स्लॅबमधून गळती झाल्याने स्लॅबचं स्ट्रक्चर खराब झाल्यास इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. परिणामी संपूर्ण इमारत खाली करण्याची पाळी बाकीच्या सभासदांवर केव्हाही येऊ शकते म्हणून प्रथम आपल्या इमारतीचं स्ट्रक्चर सुरक्षित कसं राहील हे पाहणं आपणा सर्वाचं कर्तव्य असलं पाहिजे. घरामध्ये गळती होते ती म्हणजे चुकीचं कन्सिल्ड, टॉयलेट, बाथरूम व कीचनचं नानी ट्रॅप. या नानी ट्रॅपची दर दोन वर्षांनी प्लंबरकडून घोटाई करून घेतल्यास नानी ट्रपमधून गळतीची समस्या उद्भवत नाही. नानी ट्रॅपला घोटाई करण्यासाठी फारसा खर्च येत नाही, मात्र ती वेळेवर व्हायला हवी. राहता राहिला प्रश्न नूतनीकरणाचा! एकदा नूतनीकरण झाल्यानंतर दीर्घकाळ ही समस्या उद्भवत नाही; नूतनीकरण करण्यासाठी येणाऱ्या खर्चाएवढी रक्कम लगेच फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवल्यास आवश्यकता भासल्यास नूतनीकरणाच्या खर्चाचा भार मोठय़ा प्रमाणात हलका होण्यास मदत होईल. मात्र आठवणीकरिता नूतनीकरण अशी नोंद असावी (आता डिजी लॉकर्स हा पर्यायसुद्धा उपलब्ध आहे ) म्हणजे पुढील नूतनीकरणापर्यंत मुदत वाढवता येते. अशा प्रकारे नियोजन करून सहकार्य केल्यास आपल्याबरोबर इतरांचाही आनंद द्विगुणित होईल. समाधान व लक्ष्मी, दोघांचंही वास्तव्य आपणाकडे राहो, ही सदिच्छा. 

 Written by लोकसत्ता टीम राजन बुटाला February 19, 2022 2:05:46 am

समाजसेवी संस्थांना स्वयंशिस्तीची निकड

Posted by DK on December 20, 2020

 

                                “विश्वस्त मंडळ”  :


संस्था रीतसर स्थापन करणे हे जसे कायद्याने आवश्यक असते, तसेच संस्थेच्या विशिष्ट रचनेमुळे कोणतेही कार्य करण्यात एक प्रकारे सुलभता येते. संस्थेला एक निश्चित चौकट निर्माण करून तिच्या विहित कार्याची लोकाभिमुखता काही प्रमाणात निश्चित करता येते.

संबंधित कार्यासाठी आवश्यक ती संसाधने जोडण्यास याचा फायदा होतो. अशा नोंदणीकृत संस्थांना “विश्वस्त मंडळ”  असणे हे कायद्यानेही अनिवार्य आहे.

विश्वस्त मंडळाकडे संस्थेच्या कारभारासंबंधात अंतिम निर्णय घेण्याची क्षमता असते. संस्थेच्या प्रमुख कारभाऱ्याची नेमणूक व इतर महत्त्वाच्या पदांवरील नेमणुका करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

संस्थेने केलेल्या आर्थिक मागण्या आणि दिलेले हिशोब मंजूर वा नामंजूर करणे, हे विश्वस्त मंडळाच्या जबाबदारीचा एक अविभाज्य भाग आहे. या व अशा अनेक कारणांनी संस्थेला सक्षम “विश्वस्त मंडळ”  असणे महत्त्वाचे ठरते. परंतु माझ्या अनुभवात “विश्वस्त मंडळ” ही समाजसेवी मंडळींना थोडी दुखरी बाजू वाटते. विश्वस्त आणि व्यवस्थापन यांतही अनेक नावाजलेल्या संस्थांमध्ये गल्लत होताना दिसते.

त्यामुळे संस्थेसाठी (अल्प का होईना, पण आर्थिक मोबदला घेऊन) कार्य करणारे हेच जर विश्वस्त असतील तर सध्याच्या समाजसेवी संस्थांच्या रचनेमध्ये कार्य अहवाल कोणी कोणाला सादर करावयाचा, आणि कोण कुणाला प्रश्न विचारणार, यांतही गल्लत होते. स्वत:च्या कामकाजाचा अहवाल स्वत:लाच देणे हे कुठल्याच ‘उत्तरदायित्व’ या  संकल्पनेत बसणारे नाही.

विश्वस्त आणि व्यवस्थापन यांतील ही गल्लत टाळणे ही काही तशी खर्चीक बाब नाही. संस्था करत असलेल्या कार्याची आणि ‘विश्वस्त’ या संकल्पनेची व्यवस्थित माहिती असलेल्या, परंतु आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात प्रत्यक्ष कार्यात भाग न घेणाऱ्या व्यक्तींची निवड विश्वस्त म्हणून करणे हे संस्थेच्याच हिताचे ठरते.

 विश्वस्त मंडळात महिलांचा सहभाग किमान पुरुषांच्या संख्येइतका असायला काहीच हरकत नसावी. खरं तर प्रत्येक विश्वस्त मंडळात केवळ पुरुषच असण्याची गरज नाही. महिलाही आता अशा कार्यात मागास राहिलेल्या नाहीत. पंचायती राज येऊन आता जवळजवळ ३५ वर्षं झाली आहेत. ज्या महिलांचा जन्म पंचायती राज कायद्यानंतर झाला, त्या महिलांच्या हाती आता राजकारणाची दोरीही आहे. महिलांनीसुद्धा सामाजिक कार्यात पुरुषांच्या बरोबरीने योगदान दिल्याची उदाहरणे आहेत. याची समाजसेवेच्या क्षेत्रातील मंडळींनी जाणीव ठेवून याबाबत कायद्याने सक्ती होण्याआधी स्वत:च आदर्श निर्माण करावा.

 विश्वस्त मंडळावर कोण असावेत याबद्दल अद्याप सरकारकडून काही स्पष्टता नाही, परंतु विश्वस्त मंडळाचे कार्य पाहता आणि सध्याचे त्याबद्दलचे कायदे पाहता विश्वस्त हे संस्थेच्या कार्याबद्दल सरकारला जबाबदार असतात.

(या जबाबदारीचे स्वरूप प्रत्यक्ष उदाहरणावरून वाचकांच्या लक्षात येईल. पुण्यातील एका नामवंत शिक्षणसंस्थेच्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहलीसाठी कोकणात गेले असता तिथे समुद्रात पोहताना दुर्दैवाने काही विद्यार्थी बुडाले. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्या संस्थेच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांना अटक केली गेली. पुढे ते जामिनावर सुटले, ही गोष्ट अलाहिदा.) 

त्यामुळे विश्वस्त मंडळाची जबाबदारी पेलण्यास सक्षम असलेल्या मंडळींनाच अशा मंडळावर घेणे अपेक्षित असते.

         माझ्या माहितीत पुण्यातील एका संशोधन संस्थेमध्ये सदर संस्थेला आर्थिक मदत देणाऱ्या संस्थेने विश्वस्त मंडळावर त्यांच्या किमान एका व्यक्तीची विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्या मते, सरकारी पैसा असो वा लोकांकडून गोळा केलेला असो; त्याच्या विनियोगावर अंकुश असणाऱ्या मंडळावर  दात्यांचा प्रतिनिधी असणे आवश्यक आहे. हा तर्क राज्य सरकार आणि स्थानिक सरकारपर्यंत यायची वाट पाहण्यापेक्षा संस्थांनी आपले “विश्वस्त मंडळ”  खऱ्या अर्थाने पारदर्शक, उत्तरदायी आणि प्रातिनिधिक कसे बनेल यासाठी पावले उचलल्यास संस्थांची विश्वासार्हता वाढण्यास मदतच होईल. आजघडीला याची प्रचंड गरज आहे.

 लोकसत्ता टीम | December 20, 2020 12:31 am

प्रवीण महाजन

pravinssqy@gmail.com

निवासी जागेचा व्यावसायिक वापर

Posted by DK on December 15, 2020

 

निवासी इमारत व ऑफिस इमारत या दोन्हींमध्ये खूप अंतर असते

लोकसत्ता टीम | October 24, 2020 12:58 am

 

निवासी जागेत व्यवसाय करणे वा करण्याबाबत दुसऱ्यास परवानगी देणे ही महानगरातील एक सर्रास बाब आहे. पण आजतागायत फार कोणी याबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत याचा विचार केलेला नाही. त्यामुळे प्रत्येक महानगरातील मुख्य भागातील म्हणजे रेल्वे स्थानकाजवळ, मार्केटजवळ, सरकारी ऑफिसेसजवळ असणाऱ्या निवासी इमारतीत कोणी ना कोणी, कुठले तरी ऑफिस थाटून बसले आहे. निवासी इमारत ही मुख्यत्वे निवासी वापरासाठी मंजूर झालेली असते व त्याअनुसरून त्या इमारतीच्या सुविधा ठरवलेल्या असतात. त्यात मूळ बांधकामाच्या जिन्याचे माप, लिफ्टची संख्या, सभोवतालची मोकळी जागा, पार्किंगची संख्या, इलेक्ट्रिक लोड, सिक्युरिटी या व इतर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. निवासी इमारत व ऑफिस इमारत या दोन्हींमध्ये खूप अंतर असते. त्यामुळे निवासी जागेत व्यावसायिक वापर हा त्या इमारतीतील इतर रहिवाशांचा त्रासाचा व मूलभूत हक्कांचा विषय आहे.

कायद्यानुसार वकील, सीए, आर्किटेक्ट, डॉक्टर्स यांसारख्या काही प्रोफेशनलना जरी स्वत:च्या निवासी जागेत स्वत:चे ऑफिस थाटायची परवानगी असली तरी त्यासंदर्भात काही अटी व नियमदेखील कायद्याने आखून दिले आहेत. जेणेकरून त्यांच्या कार्यालयाचा इतर कोणासही त्रास होऊ नये.

नियम क्र. १ :- निवासी जागेचे स्वामित्व हक्क असणाऱ्या फक्त मालकास त्या जागेत स्वत:चे कार्यालय सुरू करण्याचे हक्क आहेत.

नियम क्र.२ :- सदर निवासी जागेत मालकाचे वास्तव्य असणे अनिवार्य आहे.

नियम क्र.३ :- सदर निवासी जागेचा फक्त ३० टक्के हिस्सा हा कार्यालयीन कामासाठी वापरण्यास परवानगी आहे. उर्वरित ७० टक्के जागेत नियम क्र.२ प्रमाणे वास्तव्य अनिवार्य आहे.

वरील नियम हे कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट व डीसी रूलमध्ये नमूद आहेत.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था प्राधिकरण नियमावलीनुसारदेखील काही नियम नमूद आहेत.

नियम क्र.१ :- कोणत्याही निवासी जागेचा वापर त्याच्या मूळ उद्देशापासून इतर बाबींसाठी करण्याआधी संबंधित संस्थेच्या कार्यकारिणी समितीची परवानगी घेणे अनिवार्य आहे.

नियम क्र.२  :- कार्यकारिणी समितीला संबंधित बायलॉज व डीसी रूलच्या विरुद्ध जाऊन कोणतेही निर्णय घेण्यास अधिकार नाही.

आज बहुतांशी इमारतींत वरील सर्व नियमांना पायदळी तुडवत बेलगाम पद्धतीने निवासी जागेचा गैरवापर करणे ही सर्वसामान्य बाब झाली आहे. मुख्यत्वे ज्या इमारती शहराच्या मुख्य दळणवळण जागी आहेत त्या इमारतींना व तेथील रहिवाशांना वरील समस्येमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. गृहनिर्माण संस्था व तेथील सभासदांचे, कायद्याचे व नियमांचे अज्ञानपण किंवा रहिवासी जागेत कार्यालय स्थापन करणाऱ्यांची वा भाडय़ाने देणाऱ्यांची अरेरावी या कारणामुळे निवासी इमारती कार्यालयांचे प्रमाण वाढत आहे.

तरीही वर दिलेल्या सर्व माहितीच्या आधारे बहुतांश त्रस्त नागरिक या समस्येवर मार्ग काढू शकतील.

अभिषेक कुळकर्णी

erabhishekkulkarni@gmail.com

 

प्रस्तावित भाडेकरू कायदा

Posted by DK on December 15, 2020

 केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने नवीन भाडेकरू कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केलेला आहे.

लोकसत्ता टीम | November 7, 2020 12:31 am

अ‍ॅड. तन्मय केतकर

tanmayketkar@gmail.com

    वाढत्या शहरीकरणाचा आणि वाढत्या नागरीकरणाचा एक नैसर्गिक परिणाम म्हणजे भाडय़ाच्या जागा. भाडय़ाच्या जागा, भाडेकरू आणि जागामालक यांच्याकरता सध्या आपल्याकडे भाडे नियंत्रण कायदा अस्तित्वात आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाने नवीन भाडेकरू कायद्याचा मसुदा प्रसिद्ध केलेला आहे. या प्रस्तावित कायद्याची माहिती असणाऱ्या सर्वाना आणि विशेषत: भाडेकरू आणि मालक यांना असणे आवश्यक आहे.

    नवीन कायद्यानुसार कायद्याच्या एकंदर अंमलबाजावणीकरता भाडेकरू प्राधिकरण, भाडेकरू न्यायालये आणि भाडेकरू न्यायाधिकरणे स्थापन करण्यात येणार आहेत; आणि या कायद्यांतर्गत उद्भवणारी सर्व प्रकरणे त्यांच्या अखत्यारीत आणण्यात येणार आहेत.

    जिल्हाधिकारी- उपजिल्हाधिकाऱ्यापेक्षा कमी दर्जाचा नसलेल्या अधिकाऱ्याची भाडेकरू प्राधिकरण म्हणून नेमणूक करू शकेल. भाडेकरू प्राधिकरण आणि भाडेकरू न्यायालयाच्या आदेशाविरोधात भाडेकरू न्यायाधिकरणाकडे दाद मागता येऊ शकेल.

 

    राज्य सरकार आवश्यक तेथे भाडेकरू न्यायालये स्थापन करू शकेल. भाडेकरू प्राधिकरणाच्या अखत्यारीतील प्रकरणे वगळता इतर प्रकरणे भाडेकरू न्यायालय हाताळू शकेल. सध्या दिवाणी न्यायालयाला या बाबतीत असलेले अधिकार काढून घेण्यात येणार आहेत, तसेच भाडे न्यायालयाचे अधिकार देखील भाडेकरू करार आणि मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय देण्यापुरते मर्यादित असतील.

 

    प्रस्तावित कायद्यानुसार, भाडेकरार लेखी असणे आणि तो भाडेकरू प्राधिकरणाकडे दाखल करणे बंधनकारक असेल. या सगळ्याकरता डिजिटल सोय उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. भाडेकरू- मालक यांना किती काळाकरता करार आणि त्याचे नूतनीकरण करायचे हे ठरवता येईल.

 

    करार संपून भाडेकरूने जागा रिकामी न केल्यास त्यास पहिल्या दोन महिन्याकरता दुप्पट आणि त्यानंतर चौपट दराने भाडे द्यावे लागेल. भाडेकरार संपायच्या आधी भाडेकरू किंवा मालकाचे निधन झाल्यास त्याच्या वारसांना त्या कारारातील अधिकार मिळतील.

 

प्रस्तावित कायद्यानेदेखील मालकाच्या पूर्वपरवानगीशिवाय पोटभाडेकरू ठेवण्यास मनाई आहे.

 

भाडेकरारातील अटी व शर्तीनुसार भाडेवाढ करता येणार आहे. भाडेकराराच्या मुदतीत भाडेवाढ कशी, किती आणि कोणत्या आधारे करायची याची तरतूद नसल्यास अशी भाडेवाढ शक्यतोवर करता येणार नाही.

 

भाडय़ाच्या निवासी जागेकरता जास्तीतजास्त दोन महिन्यांच्या भाडय़ाएवढे आणि अनिवासी जागेकरता किमान एक महिन्याच्या भाडय़ाएवढे डिपॉझिट घेण्याची मुभा असेल.

 

भाडेकराराची एक मूळ प्रत मिळणे, दिलेल्या भाडय़ाची पावती मिळणे, हे भाडेकरूचे अधिकार असतील. मालकाने भाडे स्वीकारण्यास नकार दिल्यास,  भाडेकरूला 

प्राधिकरणाकडे भाडे जमा करता येणार आहे. भाडय़ाची जागा सुस्थितीत ठेवणे आणि अंतर्गत छोटी- मोठी दुरुस्ती करणे हे भाडेकरूचे तर बा आणि रचनात्मक दुरुस्ती ही मालकाची जबाबदारी असेल.

 

भाडेकरू आणि मालक या दोहोंपैकी कोणीही वीज-पाणी यांसारख्या अत्यावश्यक सेवांचा पुरवठा खंडित करता कामा नये, तसे झाल्यास प्राधिकरणाकडे तक्रार करून पुरवठा सुरू करून घेता येऊ शकेल आणि नुकसान भरपाई देखील मिळू शकेल.

 

मालक भाडेकरूकडून-

१. भाडेकरूने भाडे न दिल्यास,

२. भाडे किंवा इतर थकीत रकमा दोन महिन्यांकरता न दिल्यास,

३. विनापरवाना दुसऱ्यास जागेचा ताबा दिल्यास,

४. जागेचा गैरवापर केल्यास,

५. जागेच्या दुरुस्तीकरता या कारणांकरता जागेचा ताबा मागू शकेल.

थकीत भाडे भाडेकरूने दिल्यास किंवा  न्यायालयात भरल्यास त्यास काढून टाकता येणार नाही. मात्र, एक वर्षांच्या आत पुन्हा दोन महिन्यांकरता भाडे थकविल्यास भाडेकरूस असे संरक्षण उपलब्ध नसेल.

सध्या हा प्रस्तावित कायद्याचा मसुदा आहे, यात बदल होऊ शकतील. शिवाय, प्रत्येक राज्याला त्यात आवश्यक ते बदल करण्याचे आणि कायद्याच्या अंमलबजावणीकरता आवश्यक नियम बनविण्याचे अधिकार आहेत. अर्थात तसे असले तरीसुद्धा या मसुद्याची बा चौकट कायम राहील. जुना भाडे नियंत्रण कायदा जिथे कमी पडला तिथे हा कायदा प्रभावी काम करेल का ते येणारा काळ ठरवेल.

 

सोसायटीचे सभासद आणि समितीची जबाबदारी.

Posted by DK on February 15, 2020

सोसायटी समिती ही दर पाच वर्षांनी बदलणे आवश्यक आहे आणि तसा कायदाच आहे.
   
सहकारी गृहनिर्माण संस्थांची उभारणीच मुळी ‘एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उद्देशानेच झालेली आहे. परंतु दु:खद बाब अशी की, आज या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.

     सोसायटीमधील सदस्य व निवडून दिलेली समिती या दोघांचीही सारखीच जबाबदारी आहे, याचा विसर पडतो. प्रथमत: निवडून आलेल्या समितीने बायलॉजमध्ये उल्लेख असलेल्या सोसायटीचे सभासद आणि त्यांची जबाबदारी याची फोटोप्रत प्रत्येक सभासदास दिल्यास बहुतेक समस्यांचं निवारण होण्यास मदत होईल. परंतु कोणत्या सोसायटीत याचं पालन होतं? परिणामी समस्या व मतभेद निर्माण होण्याची शक्यता अधिक. सहकारी तत्त्वांचा उद्देश विफल होतो तो यामुळेच.

     सोसायटी समिती ही दर पाच वर्षांनी बदलणे आवश्यक आहे आणि तसा कायदाच आहे. गृहनिर्माण संस्थांमध्ये सचिव म्हणून काम करण्यास सहसा कोणी तयार होत नाही, परत्वे त्याच व्यक्तीस सचिव म्हणून काम करावे लागते. आणि यातूनच अरेरावी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी पार पाडावी.
सोसायटीचं कामकाज पाहताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते व त्यातील या काही प्रमुख गोष्टी.

* मासिक शुल्क थकबाकी- 
काही सभासद परिस्थिती असूनही मासिक शुल्क वेळेवर भरत नाहीत. परिणामी सचिवास कामकाज चालविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कामकाजासाठी आपला अमूल्य वेळ देणाऱ्या आपल्या सचिवास काम करणं सुलभ व्हावं म्हणून प्रत्येक सभासदाने आपलं कर्तव्य पार पाडावं.

* सोसायटीच्या दप्तरी नोंदी अद्ययावत न होणे किंवा दुर्लक्ष होणे- 
सोसायटीची सर्व रजिस्टर्स अद्ययावत करण्यावर भर देण्यात यावा.

* कोणतीही समस्या लेखी स्वरूपात देणे- 
एखाद्या सभासदाने लेखी स्वरूपात समस्या दिल्यास तो आपला अपमान आहे, असा समज करून घेऊ नये. कारण अशा समस्यांची दप्तरी नोंद आवश्यक असल्यामुळे मासिक सभेत चर्चा विचार-विनिमय होऊन तिचं निराकरण करणे सुलभ होते.

* नियमांचं उल्लंघन-
एखाद्या सभासदास आपल्या घरात मोठं काम करावयाचं असल्यास त्याबाबत सविस्तर माहिती समितीकडे देणे बंधनकारक आहे. पण असं क्वचितच होत असावं. याबाबतीत योग्य ती दक्षता घेण्यात यावी.

* सोसायटीच्या स्वच्छतेविषयीची अनास्था-  आपण ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व उच्चाटन आणि इमारतीची देखभाल यांकडे लक्ष देणे ही आपली सर्वाचीच जबाबदारी आहे. आणि याची जाणीव सर्व सभासदांना असावी. यामुळे इमारतीचं व आपलंही आयुष्यमान वाढण्यास मदत होते.

* मासिक सभा व सर्वसाधारण वार्षिक सभांबाबत अनास्था- मासिक सभेस समितीमधील सर्वानीच उपस्थित राहणं अनिवार्य आहे. बहुसंख्येने उपस्थित राहिल्यास पुढील कामकाज व समस्या यांबाबत सर्वानुमते निर्णय घेऊन शिक्कामोर्तब करणं केव्हाही हिताचंच. वार्षिक सर्वसाधारण सभेत मात्र अनेकांची अनुपस्थिती जाणवते. परंतु सभेत बहुमताने जो निर्णय होईल तो सर्वानाच बंधनकारक असतो. सभेला अनुपस्थित राहून सभेत संमत झालेल्या निर्णयांवर काथ्याकूट करणे योग्य नाही.
आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य जपण्यासाठी आपण जशी दक्षता घेतो, त्याप्रमाणे आपल्या इमारतीच्या स्वास्थ्यासाठी प्राधान्यानं दक्षता घेणं आवश्यक. कारण आपली इमारत व सर्व सभासद हेसुद्धा एक कुटुंबच आहे, याचंही भान ठेवावे.

लोकसत्ता टीम | February 15, 2020 12:50 am
 राजन बुटाला
butala21@gmail.com