वॉटरप्रुफ्रिंग : खिडकीचे ग्रिल करे इमारतीला अस्थिर.

Posted by DK on April 02, 2017
वॉटरप्रुफ्रिंग : खिडकीचे ग्रिल करे इमारतीला अस्थिर इमारतीचा आकार, आवाका याची आर्टेक्ट कल्पना करून ती आरेखनाद्वारे कागदावर उतरवतोशैलेश कुडतरकर : April 1, 2017 3:27 AM

वॉटरप्रुफ्रिंग : खिडकीचे ग्रिल करे इमारतीला अस्थिर

           काही घटना सामान्य प्रस्थापित मार्ग कायमचा बदलून टाकतात. दिनांक १२ मार्च १९९३ रोजी असेच काहीसे घडले आणि वॉटरप्रूफिंगच्या क्षेत्रात एक मोठा बदल घडून आला. जर आपल्याला आठवत असेल तर या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत कित्येक इमारती अशा होत्या की ज्यांना नीटपणे कंपाउंड नव्हते, गेट नव्हते, वॉचमन नव्हते असलाच तर वॉचमन नावाचा हरकाम्या असायचा व जो गेट सोडून बाकी सर्व ठिकाणी असायचा.
        बारा मार्चनंतर मात्र परिस्थिती बदलली. कंपाउंड आले, कर्तव्यदक्ष वॉचमन आले, गेटं लागली आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा बदल घडला आणि तो म्हणजे सरसकट सगळ्या खिडक्यांना ग्रिल लागले. एका रात्रीत सगळ्यांनी स्वखुशीने आपल्या बिल्डिंगचा कैदखाना बनवला. हा बदल ९३च्या बॉम्बस्फोट मालिकेने घडवून आणला. आज मेन गेट आणि खिडक्यांवरील ग्रिल या बहुतेक बिल्डिंगवर असतात. खूप वेळा नवीन डिझाइनच्या इमारती याला अपवाद असू शकतात. एकाएकी ग्रिल्सची आवश्यकता निर्माण झाली व त्याचा फायदा घेऊन एक फूट, दोन फूट तर काही ठिकाणी अडीच फूट खोलीच्या ग्रिल्सविना विचार करता बेछूटपणे बसविल्या गेल्या. हे हवेतील अतिक्रमण असूनसुद्धा त्याविरुद्ध कोणीतीही कृती केली गेली नाही.
     इमारतीचा आकार, आवाका याची आर्टेक्ट कल्पना करून ती आरेखनाद्वारे कागदावर उतरवतो. तिचा सांगाडा बनविण्यासाठी तो ते आरेखन स्ट्रक्चरल इंजिनीअरकडे नेतो. तेथे दोघे मिळून या इमारतीवर खूप गोष्टींचा एकत्रित विचार करतात, जसा की इमारत कुठच्या कामासाठी वापरली जाणार आहे, तेथे काय वस्तू असतील, त्यांचे वजन काय असेल, कॉलम कुठे असतील, बीम किती खोल असतील, लागू पडणारे सरकारी नियम काय असतील, आजूबाजूचे वातावरण वगैरे, पण या चर्चेत जेव्हा अडीच फूट बाहेर लटकणाऱ्या ग्रिलचा विचार होत नाही तेव्हा ते अतिरिक्त बांडगुळाच ठरते.
       ग्रिल्सची संख्या व आकार खिडक्यांच्या संख्येवर व आकारावर अवलंबून असते, परंतु एका रांगेत वरपासून खालपर्यंत बसवलेल्या ग्रिल्सचे एकंदरीत वजन हे काही टन भरू शकते व हा अतिरिक्त भार इमारतीच्या त्या भागावर पडू शकतो. त्यामुळे त्या भागामध्ये एक प्रकारचा खिचाव निर्माण होतो जेणेकरून तेथे भेगा पडू लागतात. कल्पना करा, की तुम्ही बाजारातून दोन हातातून दोन वजनाने भरलेल्या पिशव्या आणत अहात. पिशव्यांच्या वजनामुळे तुमच्या शरीरावर जमिनीच्या दिशेने खिचाव निर्माण होतो, नेमका अशाच प्रकारचा ताण इमारतीवर एक बाजूने पडतो व त्याचा परिणाम म्हणून तेथे भेगा पडू लागतात. त्या भेगांतून इमारतीच्या गाभा क्षेत्रात पाणी घुसू लागते. अशा प्रकारच्या भेगा कुठच्याही प्रकारचे भरणद्रव्य वापरून फार काळपर्यंत बुजवून ठेवता येत नाही. काही जणांचा असा अनुभव असू शकतो, की काही भेगा या दुरुस्त केल्या तरीही पुन: पुन्हा निर्माण होतात. त्याचे कारण कुठेतरी अशा प्रकारच्या समस्यांमध्ये असू शकते.
       अतिरिक्त वजन व त्यामुळे निर्माण होणारा ताण याव्यतिरिक्त लोखंडी जाळी बसविण्याचे इतरही काही तोटे आहेत. जसे की जाळी बसवताना जाडे खिळे ठोकून बसवले जातात. त्याच्या आघाताने खिळ्याभोवती बारीक भेगा पडतात व त्यातून पाणी झिरपण्याचे रस्ते तयार होतात व तो भागही थोडा दुर्बल होतो. शिवाय आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे हा खिळा गंजून कालांतराने तेथे पोकळी निर्माण होते व त्याच्या अवतीभवतीचे काँक्रीट सडू लागते. सततच्या पाणी झिरपण्यामुळे एके दिवशी ते थेट गाभा भागात पोहोचते, आरसीसी सांगाडय़ावर प्रक्रिया होऊन संपूर्ण बिल्डिंग अस्थिर होण्यास आणखी एक घटक म्हणून ग्रिलची मदत होते. खिडक्या हा आपत्कालीन परिस्थितीत इमारतीत शिरण्याचा किंवा तेथून निघण्याचा मार्ग असतो. आगीचे बंबवाले इथूनच घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस लोखंडी जाळ्या हा मोठा अवरोध ठरू शकतो. जाळ्या बसवताना हा विचार बहुधा केला जात नाही. या लोखंडी जाळ्यामध्ये कलेचा आविष्कारसुद्धा क्वचितच असतो. जाळ्या ढोबळपणे स्क्वेअर, राउंड, फ्लॅट वगैरे लोखंडी सेक्शन्स प्रकारचे साहित्य वापरून केलेल्या असतात. त्यांचा वापरही लहान मुलांच्या जेवणाच्या जागेपासून ते नको असलेलं सामान ठेवण्याची जागा यामध्ये सोयीप्रमाणे कसाही केला जातो. सुंदर बिल्डिंगचं मातेरं करण्याची क्षमता या जाळ्यांमध्ये आहे. जाळ्यांमुळे शहराला एकप्रकारे बकाल स्वरूप आले आहे.
        सुरक्षा हीसुद्धा अग्रक्रमी गरज आहे. मग काय जाळ्या लावूच नयेत? असा विचार करायची काही गरज नाही. जाळ्या लावतानाच जर विचारपूर्वक लावल्या तर समस्येची काही प्रमाणात तरी उकल होईल. ग्रिल्स लावल्यावर त्यातून आपल्यला काही त्रुटी जाणवत असतील तर त्यातून आपण काही मार्ग काढलाच पाहिजे. जाळ्या लावताना पुढील गोष्टींचा जरूर विचार व्हावा.
      नवीन डिझाइनच्या इमारतीमध्ये याचा काही विचार केलेला दिसतो. त्यामध्ये ग्रिल्स अशा रीतीने बसवल्या जातात जेणेकरून त्या लटकत रहात नाहीत व त्यांचा भार व्यवस्थितरीत्या सांगाडय़ावर विभागून टाकला जातो. परंतु डिझाइनमध्येच फेरफार करून सुरक्षा मिळावी, पण ग्रिल लावावे लागू नये अशी सोय केलेली काही ठिकाणी दिसते. ग्रिल्स लावाव्या लागणार असतील तर त्याचा विचार आरसीसीचा आराखडा करताना व्हावा जेणेकरून वजन घटकाचा विचार वेळीच होऊन त्याचे प्रमाणबद्ध विभाजन होऊ  शकेल. ग्रिल्स बनविण्याचे साहित्य प्रमाणित करावे. उगाचच जरूर नसताना भारी वजनदार सामान वापरून भार वाढवू नये. शक्य तेथे अ‍ॅलुमिनियमसारख्या हलक्या धातूंचा वापर करावा. ग्रिल्सचा आकार प्रमाणित करावा. ग्रिल्सच्या माध्यमातून हवेत अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. खोली आवश्यक तेवढीच असावी. १ फूट ते अडीच फुटांचे पिंजरे लावू नयेत. ग्रिल्समध्ये जुने सामान, खोके, मुलांच्या सायकली, अडगळीचे सामान ठेवण्याची सोय असू नये. ग्रिल्सला एक तरी दरवाजा ठेवून आणीबाणीच्या वेळेस वापरायचा मार्ग मोकळा ठेवावा. कमीतकमी खिळ्यांचा वापर करून क्षती पावलेल्या जागेवर वेळीच मलमपट्टी करावी. खिळ्यांचे डोके खास मिळणाऱ्या पदार्थाने आच्छादून सर्व बाजूने वॉटरप्रूफ करावे.
       वरील गोष्टी लक्षात घेऊन परत एकदा तुम्ही तुमच्या बिल्डिंगकडे त्रयस्थाच्या नजरेतून पाहा आणि जरा बघा की काही सुधारणा करता येण्यासारख्या आहेत का? आपणच केलेल्या काही चुका सुधारून आपण आपल्या इमारतीचे वॉटरप्रूफिंग सुधारण्यास मदत करू शकतो, नाही का?
Categories:

Related Posts: